नियोजनातून उद्देशाला उद्दिष्ट प्राप्त व्हावे!

उद्देश चांगला असला, तरी त्यासोबत नियोजन देखील उत्तम असायला हवे, अन्यथा दिशा भरकटल्याने उद्देश निरुद्देश होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच चांगला उद्देश असणे जितके आवश्यक आहे, त्याहून अधिक त्यामागील नियोजन अत्यावश्यक आहे.

वजन वाढवून अथवा कमी करून योग्य शरीरयष्टी प्राप्त करणे हा उद्देश चांगला आहे, पण त्यामागे जर नियोजन नसेल, तर आपले शरीरस्वास्थ्य बिघडू शकते. गुंतवणुकीद्वारे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे हा उद्देश चांगला आहे, पण त्यामागे नियोजन नसेल, तर आर्थिक पारतंत्र्य येऊ शकते. म्हणूनच आपल्या प्रत्येक उद्देशामागे सखोल विचार असायला हवा, जो आपल्या उद्देशाला उद्दिष्ट प्राप्त करून देईल.

परीक्षेमध्ये पास होणे हा जर आपला उद्देश असेल, तर त्यासाठी आपण अभ्यासाचे नियोजन करतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यवसायात यश प्राप्त करणे हा जर आपला उद्देश असेल, तर त्या व्यवसायाशी निगडीत प्रशिक्षणाचे आपले नियोजन असायला हवे. अशाप्रकारे नियोजनातून संबंधित विषयाचे जे आकलन होते त्यातूनच उद्देशपूर्तीला चालना मिळते.

आपल्या सद्य परिस्थितीला अनुसरून कोण काय म्हणत आहे? याकडे सन्मानपूर्वक दुर्लक्ष करायचे असेल, तर प्रथम आपल्या उद्देशाची आणि नियोजनाची स्वतःसाठी खात्री पटलेली असावी. याकरिता त्यानुषंगाने चिंतन व सर्वांगीण विचार असायला हवा. कारण यातूनच नियोजनासाठी आवश्यक असलेली वैचारिक दिशा आपल्याला मिळू शकते.

थोडक्यात उद्देशाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘नियोजन’ हा एक राजमार्ग आहे. आयुष्याची दिशा ठरवत असताना हा राजमार्ग धरून चालावा.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!