चौकस एकाग्रता असावी!

एकाहून अधिक गोष्टींमध्ये लक्ष घालने हे वरकरणी धरसोडवृत्तीचे लक्षण वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हे चौकसवृत्तीचे प्रमाण देखील असू शकते. एकाच विषयात एकाग्र झाल्याने गती मिळते, परंतु अनेक विषयांची सांगड घातल्याने प्रगती होते. चौकटीतील जग जगण्यासाठी एकाग्रता रहावी, तसे चौकटीबाहेरील जग पाहण्यासाठी चौकसता असावी. म्हणूनच समाजाच्या व्यापक हितासाठी काहींनी एकाग्र होणे, तर काहींनी सांगड घालणे गरजेचे असते.

विषयांची सांगड
अनेक विषयांची सांगड घातल्याने प्रगती होते

चौकस एकाग्रतेतून चौकटीबाहेरील जग

अनेक विषयात लक्ष घातल्याने नव्हे, परंतु अनेक विषयात तोकडे लक्ष घातल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी माणसाची गत होऊ शकते. त्यामुळे एकावेळी अनेक विषय हाती घेतले, तर प्रत्येक विषयात दिवसागणिक अधिकाधिक सखोल शिरण्याचा आपला सातत्यपूर्ण उपक्रम असायला हवा. यालाच मी ‘चौकस एकाग्रता’ असे म्हणतो. अशाप्रकारे चौकस एकाग्र असलेली माणसे यशस्वी होतात, अयशस्वी होतात, परंतु अखेर तीच जगाला चौकटीबाहेरील जग दाखवतात. त्यामुळे त्यांचे या जगातील मोल देखील अधिक असते.

चौकस एकाग्रता
प्रत्येक विषयात दिवसागणिक प्रगती करावी

चौकस एकाग्रता यशस्वीरित्या जपण्यासाठी व्यवस्थापनाची पराकाष्टा करावी लागते. परंतु असे व्यवस्थापन शक्य झाल्यास मिळणारे यश देखील व्यापक असते.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!