प्रतिभा हा निसर्गप्रवाहाचा झरा!

या विश्वात अट्टाहासाने काही साध्य करण्याकडे माणसाचा कल असतो, पण प्रतिभा मात्र अशी अट्टाहासाने व्यक्त होत नाही. प्रतिभा हा केवळ निसर्गप्रवाहाचा एक झरा आहे, जो वेळपरत्वे स्फुरतो, परिस्थितीने झरतो आणि ओंजळीत उरतो. हा झरा आपल्या कलाने, आपल्या मार्गाने, कार्यकारण भावाने वहात असतो. आपण तो निर्माण करू शकत नाही, तर केवळ त्याचा ठाव घेऊ शकतो.

निसर्गप्रवाहाचा झरा
निसर्गप्रवाहाचा झरा आपली वाट काढत असतो

अट्टहास विहीर खोदण्याचा, झऱ्याचा नाही!

आपल्याला जी जमीन लाभली आहे, त्या जमिनीच्या गर्भात पाण्याचा झरा आहे का? कदाचित वरकरणी याची काही लक्षणे सांगता येतील, परंतु प्रत्यक्ष विहीर खोदल्यानंतरच त्याचा अनुभव घडू शकेल. इथे अट्टाहास हा केवळ विहीर खोदण्याचा केला जाऊ शकतो, झऱ्याचा नाही! झऱ्याला आपल्याशी काही देणेघेणे नाही, तो आपली वाट काढतो आहे. त्याचप्रमाणे आपल्यात प्रतिभा आहे का? याची अनुभूती साधनेतून सिद्ध झाल्यानंतरच येऊ शकते.

साधना सिद्ध करते, प्रतिभा साध्य होते

निसर्गप्रवाह आपल्यातून स्फुरावा याकरिता जे कष्ट वेचले जातात, त्याला आपण ‘साधना’ म्हणतो. साधना माणसाला सिद्ध करते, प्रतिभा मात्र निसर्गप्रवाहातूनच साध्य होते. विहीर खोदण्याचे कष्ट उपसले म्हणून पाणी लागत नाही, ते जलप्रवाहावर अवलंबून असते. दुष्काळात कोरडी असणारी विहीर, पावसाळ्यात भरून वाहू शकते! प्रतिभेची प्रतीक्षा देखील कलावंताला अशीच संयमाने करावी लागते.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!