भाजप महाराष्ट्रद्रोही आहे का!?

पंतप्रधानांचे गुजरातवरील प्रेम सर्वश्रूत आहे. मुळात त्यांचे हे प्रेम पाहूनच तिथल्या जनतेने त्यांना डोक्यावर उचलून घेतले आणि दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास सुकर केला. तिकडे बेळगाव प्रश्नाबाबत कर्नाटकातील भाजपची कडवट भूमिका देखील आपण जाणतो. परंतु इकडे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष मात्र महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठबळ देतो, त्यांच्याआडून स्वतः महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतो, हे एव्हाना वेळोवेळी दिसून आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय ज्या मराठी मातीत आहे, त्या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी मातीबद्दल त्यांना किती प्रेम आहे!?

भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रद्रोही आहे का?

अखंड भारताचे स्वप्न पहात असताना संघाला आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला भाषावार प्रांतरचनेचा मोठा अडसर वाटतो. त्यामुळेच त्यांना छोटी राज्ये हवी असतात. अर्थात छोटी राज्ये करण्याचा विषय निघतो, तेंव्हा त्यात सोयीस्कररित्या गुजरात-सौराष्ट्रचे नाव येत नाही. उद्या महाराष्ट्राचे विघटन होऊन महाराष्ट्र हिंदीकडे झुकला, तर कदाचित त्याचा भाजपला मनस्वी आनंदच होईल! कारण ‘एक देश, एक भाषा’ हे त्यांचे छुपे धोरण आहे. छुपे अशासाठी, कारण स्वतःच्या भावना सुखावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तर्कविहीन कारवाया या लपूनछपूनच कराव्या लागतात. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही आहे का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष असेल, परंतु माझ्यामते तसे मानण्यास नक्कीच वाव आहे.

सुरुवातीला हा पक्ष जेंव्हा सत्तेत आला, तेंव्हा झी नेटवर्क आणि काही वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राचे विघटन करण्याचा विखारी विचार समाजात रुजवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. मराठी मालिकेत हिंदी पात्र आणने, ‘हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, जरा तोंड सांभाळून बोल’, असे हिंदी पात्राकरवी हिंदीमधून मराठी माणसाला सुनावणे, हा सारा खोडसाळपणा झी मराठीने भाजप सत्तेत आल्यानंतरच सुरु केला हा काही योगायोग नव्हता. त्यानंतर वेगळ्या विदर्भासह वेगळ्या मराठवाड्याचाही मुद्दा पुढे रेटण्याचा भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. परंतु जनता आपल्या मताशी सहमत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली योजना तात्पुरती बासनात गुंडाळून ठेवली. अर्थात हे धोरण योग्य वातावरणाची वाट पाहणाऱ्या विषाणूप्रमाणे आहे हे वेगळे सांगायला नको.

अलीकडेच महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर हा पक्ष अगदी वैफल्यग्रस्त होऊन आक्रस्ताळेपणा करू लागला. या आक्रस्ताळेपणात त्यांची मती एव्हढी भर्मिष्ट झाली की, ज्या राज्याची मते मिळवायची त्याच राज्याला त्यांनी बदनाम करण्यास सुरुवात केली. दीड दमडीचा संपादक आणि फुटकळ नटी यांच्या पदराआड लपून त्यांनी महाराष्ट्रावर चिखलफेक केली. आणि विशेष म्हणजे त्याचे खापर विरोधकांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भाजप काय आहे? आणि या पक्षाचे काय चालले आहे? हे न समजण्याइतपत महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. म्हणूनच यंदाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्राने यांना त्यांची खरी जागा दाखवून दिली.

पंतप्रधानांचे त्यांच्या राज्यावर प्रेम होते, म्हणून त्यांच्या राज्याने त्यांना ताकद देऊन पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवले. राष्ट्रवादीचे प्रमुख मराठी महाराष्ट्राच्या प्रश्नांना आयुष्यभर ‘संकुचित’ म्हणत राहीले, त्यामुळे महाराष्ट्राने त्यांना कधीच खरी ताकद दिली नाही, त्यांची मनोमन इच्छा असूनही त्यांना पंतप्रधान होता आले नाही. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यातून काही धडा घ्यावा. भारतीय जनता पक्षाला भविष्यात मोठी मजल मारायची असेल, तर त्यासाठी प्रथम मराठी महाराष्ट्राचा वरदहस्त मिळवणे क्रमप्राप्त आहे!

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!