मराठीची नैसर्गिक मागणी व्हावी!

महाराष्ट्राला ‘दगडांच्या देशा’ असे म्हटले जाते, जे भाषिक उदासीनतेबाबत अगदी शब्दशः खरे आहे. एकीकडे ‘भाषा जगली काय, मेली काय’ असे समजणारा समाजवाद, तर दुसरीकडे ‘एक देश, एक भाषा’ असे मानून चालणारा धर्मवाद यांत मधल्यामध्ये मराठीची आजवर ससेहोलपट होत आली आहे. मुळात भाषा ही ऊर्जावाहक असते, भाषेचा अर्थकारणाशी आणि त्यायोगे राष्ट्रउभारणीशी थेट संबंध असतो हे अनेकांच्या खिजगणतीतही नसते. भाषा या साधनाचे तर्कसंगत मोल लक्षात न आल्याने निर्माण झालेल्या वैचारिक गोंधळातून आज जी अस्वस्थता आणि वैफल्यग्रस्तता पसरली आहे त्यातून भाषेचे मूल्य हे अधिकच घसरले आहे.

मराठी महाराष्ट्र
मराठी भाषा महाराष्ट्रातील अर्थकारणाचे साधन

आत्मविश्वासाने मराठीत व्यवहार करावा

आर्थिक नफा मिळवणे आणि तो वाढवत नेणे हे कोणत्याही कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असते. तेंव्हा महाराष्ट्रात मराठी समाजाकडून जर खरोखरच मराठी भाषेची नैसर्गिक मागणी होत असती, तर कोणत्याही कंपनीने मराठीला डावलण्याचे आर्थिक धाडस केले नसते. पण ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी आपली गत आहे. आपल्या भाषेत आत्मविश्वासाने व्यवहार करणे तर सोडाच, परंतु असा व्यवहार करणे हे बहुतांश मराठी माणसांच्या लेखी संकुचितपणाचे आणि त्यायोगे कमीपणाचे समजले जाते याहून मोठा वस्तुस्थितीचा विपर्यास नसावा.

मराठीच्या अस्वस्थतेकडे वेळीच लक्ष द्यावे

एखाद्या राजकीय पक्षाद्वारे भाषिक अन्यायाच्या निमित्ताने करण्यात येणारी प्रतीकात्मक तोडफोड ही केवळ अनाकलनातून आलेल्या वैफल्यग्रस्ततेला मिळालेली एक मोकळी वाट असते. अशी तोडफोड करणे हे लोकार्थाने संकेतांना धरून नसते. पण वडिलांनी जर आईच्या ठिकाणी मावशी आणून ठेवली असेल, आणि ती मुलाला सावत्र वागणूक देत असेल, तर अशावेळी आपल्या आगतिकतेकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुलाने काय करावे? वात्रट म्हणून जगासमोर मुलाची अवहेलना करत राहणे वडिलांना कितीकाळ शक्य होईल? शेवटी मूल तर मोठे होणारच! त्यामुळे तोडफोडीमागील मूळ अस्वस्थता आपण वेळीच लक्षात घ्यायला हवी.

आज अनेक वाहिन्या व सेवा या हिंदी भाषेसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये देखील अगदी सहजासहजी उपलब्ध होतात. कारण या प्रदेशांमधून त्यांच्या मातृभाषेची नैसर्गिक मागणी होते. मराठी माणसाच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्रातूनही अशी मागणी होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास या प्रश्नाच्या निमित्ताने निर्माण झालेली अस्वस्थता आणि वैफल्यग्रस्तता आपोआपच निवळली जाईल.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!