महाराष्ट्राच्या अस्वस्थतेमागील अंदाजाला चौकट मिळाली!

महाराष्ट्रातील दोन पिढ्यांआधीच्या लेखकांची पुस्तके मला वाचायला आवडतात. कारण मागील शंभर वर्षांत समाजवादातून रुजवण्यात आलेली संकुचितपणाची भिड ते बाळगताना दिसत नाहीत. त्याकाळी खरा महाराष्ट्रवाद अस्तित्वात होता. जुनी माणसे समाजाच्या हितासाठी प्रामाणिक अंतःकरणाने आपले जे काही मत असेल ते अगदी स्पष्टपणे मांडत असत. महाराष्ट्राला जो वैचारिक वारसा आहे तो हाच! त्यानंतर मागील दोन पिढ्यांमध्ये जो समाजवाद फोफावला, त्यात मात्र महाराष्ट्राची अनन्यसाधारण वैचारिक हानी झाली. याकाळात खरी वैचारिकता मागे पडली आणि वैचारिकतेचे समाजवादी ढोंग साजरे झाले, जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठले! अर्थात याकामी धर्मवाद्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. एरवी जे एकमेकांच्या मुळावर उठलेले असतात, ते महाराष्ट्राच्या मुळावर उठताना मात्र अगदी जिवलग मित्राप्रमाणे गळ्यातगळे घालताना दिसतात.

संयुक्त महाराष्ट्र
संयुक्त महाराष्ट्र – दि. के. बेडेकर

संयुक्त महाराष्ट्र : दि. के. बेडेकर यांची वस्तुनिष्ठ मांडणी

महाराष्ट्र हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तेंव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि एकंदर महाराष्ट्राविषयी अधिक माहिती मिळावी या उद्देशाने मागे मी एकदा किंडलवर शोध घेतला होता. त्यावेळी मला दि. के. बेडेकर यांचे ‘संयुक्त महाराष्ट्र’ हे पुस्तक सापडले. १९४७ सालच्या या पुस्तकात महाराष्ट्राच्या तत्कालीन वैचारिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आलेली असून नुकतेच मी हे पुस्तक वाचून पूर्ण केले आहे. निरीक्षणातून आणि चिंतनातून महाराष्ट्रातील एकंदर वैचारिक व सामाजिक अस्वस्थतेचा आजवर मला जो अंदाज आला होता, त्या अंदाजाला या पुस्तकातून एक चौकट मिळाली आहे. बेडेकर यांनी आपल्या पुस्तकातून काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या मुद्द्यांच्या अनुषंगाने मी माझे विश्लेषण येत्याकाळात मांडणार आहे. यातून महाराष्ट्राची आजची परिस्थिती अशी का आहे? आणि भविष्यात महाराष्ट्राची वाटचाल कशी असायला हवी? याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!