माहितीरंजन वाहिन्यांचे मराठीतून प्रसारण व्हावे!

‘डिस्कवरी’ वाहिनीवरून मध्यंतरी मराठी भाषेतून प्रसारणास सुरुवात झाली होती. कदाचित या प्रसारणास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसेल, परंतु मराठी भाषेतील हे प्रसारण सध्या बंद आहे. मराठी भाषेतील एखाद्या वाहिनीचे प्रसारण अशाप्रकारे बंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘हिस्टरी टीव्ही एटीन’ने देखील मराठी भाषेतून प्रसारण सुरू केले होते, जे कालांतराने बंद करण्यात आले. मराठी माणसाची भाषिक उदासीनता हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु मला इथे काही वेगळे मुद्दे मांडायचे आहेत.

आपल्याला एखादी परकीय भाषा समजली, तरी मातृभाषेची ‘सर’ ही त्या भाषेला येत नाही. ‘हिस्टरी टीव्हीने एटीन’ने जे मराठी प्रसारण सुरू केले होते, ते अत्यंत उत्कृष्टप्रतीचे होते. मराठी भाषेतील त्यांचे कार्यक्रम हे काही काळ युट्युबवर देखील उपलब्ध होते. डिस्कवरीने प्रसारित केलेले मराठी कार्यक्रम आजही त्यांच्या प्रणालीवर मराठीतून पाहता येतात. डिस्कवरीचे कार्यक्रम मराठीतून पहात असताना त्यातून जी माहिती मिळते ती मनाला जास्त भिडते, कारण मातृभाषा ही माणसाच्या शरीरमनाच्या कार्यप्रणालीची भाषा असते. मातृभाषेत मानवी कार्यप्रणाली अधिक उत्तमरित्या काम करू शकते.

डिस्कवरी मराठी
डिस्कवरी मराठी

आता ‘डिस्कवरी’, ‘हिस्टरी टीव्ही एटीन’ सारख्या माहितीरंजन वाहिन्यांचे प्रसारण पुन्हा मराठीतून सुरू व्हावे यासाठी काय करता येईल? हा खरा प्रश्न आहे. आपण त्यांना पत्र पाठवून, तसेच प्ले स्टोअर सारख्या ठिकाणी समीक्षा लिहून मराठी प्रसारणाची विनंती करू शकतो. आपल्या एका पत्राने काय होणार? असा विचार करण्याऐवजी आपल्या एका पत्राशिवाय काहीच होणार नाही असा विचार करावा. शेवटी कोण काय करत आहे? यापेक्षा आपण काय करत आहोत? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कारण दुसऱ्यांनी काय करावे? हे आपण सांगू शकत नसलो, तरी आपण काय करायला हवे? हे मात्र आपल्याच हातात असते.

इंग्लिश वा हिंदी भाषिक व्यक्ती एखाद्या सेवेसाठी जेव्हढे पैसे मोजत असेल, तेव्हढेच पैसे जर आपण मोजत असू, तर ती सेवा इंग्लिश वा हिंदी प्रमाणे आपल्या भाषेतून देखील उपलब्ध व्हायला हवी हे सांगण्याचा आपल्याला ग्राहक म्हणून अधिकार आहे. तेंव्हा आपल्या भाषेची मागणी करत असताना या अर्थकारणाची देखील जरूर आठवण करून द्यावी. तसेच याद्वारे भाषिक भेदभाव देखील अधोरेखित होतो, जो खरा आहे. कारण दहा कोटी जनतेला त्यांच्या मातृभाषेत सेवा मिळू नये हा अन्याय आहे.

hello@discovery.com या विपत्र पत्त्यावर पत्र पाठवून मी डिस्कवरीकडे मराठी प्रसारण पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. मराठी प्रसारण नसल्याने डिस्कवरी नेटवर्क डिश टिव्ही वरून काढत असल्याचे मी त्यात नमूद केले आहे आणि प्रत्यक्षात ते काढून देखील टाकले आहे. मी समान पैसे देत असताना मला समानसेवा मिळावी एव्हढीच माझी माफक अपेक्षा आहे. डिस्कवरीने अभिप्राय मिळाल्याची पोचपावती दिली आहे. पत्र पाठवणे, पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्य होते आणि आहे. आता त्या पत्राची दखल घेणे न घेणे हा ‘डिस्कव्हरी’च्या निर्णयप्रक्रियेचा भाग झाला.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2020
error: Content is protected !!