आपल्याला माहीत असते, पण आपले लक्ष नसते

अनेक गोष्टी आपल्याला खरेतर माहीत असतात, पण त्या आपणाला खरंच कधी लक्षात येत नाहीत, कारण आपण त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत राहतो. उदाहरणार्थ, आपल्या आयुष्याला कालमर्यादा असल्याचे खरेतर आपल्याला माहित असते, पण सोयीस्कर दुर्लक्ष करत राहील्याने ते आपणाला खरंच कधी लक्षात येत नाही, त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात अमर्याद वेळ असल्याप्रमाणे वावरतो.

काळ मर्यादित, वेळ अमर्यादित!

थोडक्यात आपल्याकडे ‘काळ’ मर्यादित असल्याचे आपल्याला माहीत असले, तरी आपण ‘वेळ’ अमर्याद असल्याप्रमाणे जगत राहतो. परंतु आपण प्राप्त परिस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष न करता जर व्यवस्थित लक्ष पुरवले, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी निरनिराळी ‘वेळ’ आपल्या अनुभवास न राहता, केवळ एकचएक ‘काळ’ आपल्या अनुभूतीत येईल. त्यानंतर आपण स्वतःसाठी फक्त अशी कामे निवडू ज्यातून मर्यादित काळाचे मोल जपले जाईल.

लक्ष
माहीत असते, पण लक्ष नसते

लक्ष दिल्याने जाणीवेची उत्क्रांती

अशाप्रकारे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक असतात, पण आपण त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत राहतो. जसे आपण विचार करत आहोत हे आपल्याला माहीत असते, पण आपल्या मनात विचार चालू आहेत याकडे आपले लक्ष नसते. आपल्याला हे माहीत असते की आपण या अफाट विश्वातील एका कणाप्रमाणे आहोत, तरी आपण असे वावरतो जणू सारे विश्व आपल्याभोवती फिरत आहे.

स्वतःकडे केवळ एक शरीरमन म्हणून पाहिले आणि या विश्वातील आपल्या सूक्ष्म स्थानाकडे व्यवस्थित लक्ष दिले, तर या शरीरमनापलिकडील विश्व नव्याने आपल्या जाणीवेत येऊ शकते. थोडक्यात ज्या गोष्टी आपल्याला आधीपासूनच माहीत आहेत, त्या गोष्टींकडे जर आपण अधिक लक्ष पुरवले, तर आपली, आपल्या जाणीवेची उत्क्रांती होऊ शकते.

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021
error: Content is protected !!